पुणे - हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी त्याच्या समर्थकांसह पुन्हा अटक केली आहे. तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने मुंबई-पुणे महामार्गावरून शेकडो समर्थकांसह अलिशान वाहनातून मिरवणूक काढली होती. त्याशिवाय कोथरूड परिसरातही फटाके फोडून, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण तयार केले होते. याप्रकरणी आता कोथरूड पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशत पसरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवल्याने अटक
कुख्यात गुंड गजानन मारणे याची पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. सोमवारी (दि. १५) सायंकाळी त्याला नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर समर्थकांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यापर्यंत शेकडो गाड्यातून त्याची मिरवणूक काढली होती. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने त्याने बेकायदेशीर जमाव जमवला. समर्थकांनी फटाके वाजवून आरडाओरडा केली. त्यानंतर संपूर्ण घटनेचे ड्रोन कॅमे-याने चित्रीकरण केले. याप्रकरणी कुख्यात गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला व त्याच्या साथीदारांना पुन्हा अटक केली.