पुणे - शालेय जीवनात कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी ध्येयाने झपाटणे, समपर्ण भावना आणि सकारात्मकता या त्रिसुत्रीवर शिक्षणाचा भर होता. आयुष्यात ज्या विषयात रस आहे त्यातच काम करा, हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे, अशा भावना नियोजित भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केल्या. ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
अभियांत्रिकीमध्ये ड्रॉईंग काढणे हा माझा आवडता छंद होता. तसेच तो विषयही होता. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे तीन कोनातून पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली. त्याचा पुढील वाटचालीसाठी खूप उपयोग झाला. त्यामुळेच हे यश संपादन करू शकलो असल्याचे नरवणे म्हणाले.
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या महामेळाव्यामध्ये ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’चे संचालक आणि ‘ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर, ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेवेळी प्राचार्य असलेले यशवंतराव लेले, वामनवराव अभ्यंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या महामेळाव्यात शासकीय सेवेबरोबरच शिक्षण, संशोधन, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, क्रीडा, अभियांत्रिकी, प्रसारमाध्यमे, कला अशा विविध क्षेत्रातील गेल्या ५० वर्षातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.