पुणे - उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून जागोजागी पाणपोई पाहायला मिळायची. मात्र, बदलत्या काळात पाणपोयांची संख्याही कमी झाली आहे. असे असताना पुण्यातल्या मंडई परिसरात मात्र एक अनोखी संकल्पना कित्येक वर्षापासून राबवली जात आहे. येथे उन्हात तहानलेल्या नागरिकांना चक्क मोफत ताक वाटप केले जाते.
पुणे शहरातल्या मंडई परिसरात असलेल्या बदामी चौक येथे लक्ष्मी हे मंगल कार्यासाठी साहित्य पुरवणारे दुकान आहे. या दुकानाचे मालक बच्चुभाई बयानी यांनी २१ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात नागरिकांना सोय व्हावी या दृष्टीने शरीराला थंडावा देणारे आरोग्यदायी ताक वाटपाचे काम सुरू केले. हळूहळू ही अनोखी ताक पोई परिसरात चांगलीच लोकप्रिय झाली. उन्हाळा सुरू झाला की, मंडई परिसरात येणार्या नागरिकांची पावलं लक्ष्मी दुकानाकडे वळतात ती ताक पिण्यासाठी. बच्चुभाई बयानी आज हयात नाहीत. मात्र, त्यांच्या पुतण्यांनी तसेच त्यांच्या पत्नीने बच्चू भाईंचा हा अभिनव उपक्रम कायम ठेवला आहे. स्वखर्चाने कुणाकडूनही पैसे न घेता या कुटुंबाने नागरिकांना मोफत ताक देण्याचा वसा घेतला आहे.
प्रत्येक वर्षी रंगपंचमीनंतर बयाणी यांची ही ताक पोई सुरू होते आणि पहिल्या पावसापर्यंत नागरिकांना या ठिकाणी ताक प्यायला मिळत तेही मोफत. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ताक वाटपाचे काम केले जाते. यासाठी दुकानातील कामगार हे उपलब्ध असतात. दररोज आठ ते दहा लिटर दूध विकत घेऊन त्याचे दही लावून ताक घरीच केले जाते. एकंदरीतच पुण्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांपैकी ताकपोई हे एक ठिकाण म्हणायला हरकत नाही.