पुणे- मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघात आठ जण जखमी झाले आहेत. 8 जणांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर द्रुतगती मार्गा जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भरधाव इनोव्हा मोटारीने पुढे असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात इनोव्हा मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. रोहन शिर्के, रवी शिवशरण, ममता पिवाल, राम पिलाव अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त इनोव्हा मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. सोमटने गावच्या हद्दीत येताच भरधाव इनोव्हा मोटारीने पुढे असलेल्या अज्ञात वाहनाला जोरात धडक दिली. या अपघातात इनोव्हा मोटारीतील प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी शिरगाव पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला घेतले.