पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तीन तर देहूरोड पोलिसांनी एक असे एकूण चार आरोपी जेरबंद केले आहेत. हल्ल्याची ही घटना गुरुवारी (दि. 5 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे.
प्रशांत कैलास भालेकर (वय 19 वर्षे), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या हातावर वार करण्यात आले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून फिल्मी स्टाईलने तक्रारदाराला मारण्यात आले होते.
या प्रकरणी मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ, रोण्या फजगे आणि आदित्य याला निगडीचे पोलीस कर्मचारी सतीश ढोले यांनी अटक केली असून आणखी एका आरोपीस देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रशांत कैलास भालेकर (रा. ओटा स्कीम, निगडी) हा तरुण गुरुवारी दुपारी मित्रांसह शिरगाव येथील प्रति साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. भालेकर आणि मित्र दर्शन घेऊन परतले, तेव्हा मित्रांसह किवळे येथील विकास नगर येथे मिसळ खाण्यासाठी थांबले होते. मिसळ खात असताना अचानक चार जणांनी त्याचवेळी संधी साधत आरोपी डॅनी तांदळे, मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ यांच्यासह इतर दोन साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून प्रशांतवर बाहेर ओढत तलवारीने हातावर वार करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यानंतर आरोपींनी घटनस्थळावरून पोबारा केला. परंतु, काही तासांमध्ये निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सतीश ढोलेसह इतर कर्मचाऱ्यांनी तीन आरोपीला पकडले. त्यानंतर त्यांना देहूरोड पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. तर देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली. गुन्हेगारांवर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पिंपरीत मोबाईलच्या बॅटरीचा तोंडात स्फोट; एक जण जखमी