पुणे Found Hippo Remains In Marathwada : मराठवाडा हे नाव समोर आलं की सातत्यानं आठवत राहतो तो दुष्काळ, पाण्याअभावी आत्महत्या करणारे शेतकरी, एकेकाळी रेल्वेनं पाणी पुरवठा करावा लागणारी शहरं, अशी या मराठवाड्याची ओळख झाली आहे. प्रामुख्यानं लातूर, बार्शी आणि बीड हे तीन जिल्हे सतत दुष्काळग्रस्त म्हणून सर्वांनाच परिचयाची आहेत. परंतु याच मराठवाड्यात एकेकाळी मोठी जलसंपदा आणि वनस्पती असल्याचं एका संशोधनातून पुढं आलेलं आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागानं केलेल्या लातूर जिल्ह्यातील संशोधनातून पाण्यात राहणाऱ्या पानघोडा, हत्ती या प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत, असा दावा करण्यात आला आहे.
संशोधनात आढळले विविध प्राण्यांचे अवशेष : पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या संशोधनात, विविध प्राण्यांचे अवशेष या दुष्काळी भागात सापडल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पानघोडा, हत्ती आणि वाघ यांचे हे अवशेष असल्याचा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे. साधारणपणे हे प्राणी ज्या भागात वस्ती करतात, त्या भागात पाणीही मोठ्या प्रमाणात असते. तसा जलमय परिसर असल्यानं ते वास्तव्य करत असतात, असं संशोधनातून पुढं आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यात सुद्धा एकेकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होती, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यात केलं संशोधन : डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे माजी प्राध्यापक डॉक्टर विजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील अति दुष्काळग्रस्त असलेल्या लातूर, बीड, या भागात 2004 पासून संशोधन करायला सुरुवात केली. 2004 ते 2023 पर्यंत त्यांच्या संशोधनातून अनेक प्राण्यांचं वास्तव्य या भागात आढळून आलं आहे. लातूर जिल्ह्यातील हरवाडी, अंबाजोगाई परिसरामध्ये हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनात उत्खनन केल्यानंतर जे अवशेष सापडले, त्यात मोठा पर्यावरणाचा इतिहास महाराष्ट्रासमोर आल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
मुबलक पाणी उपलब्ध होण्यास संशोधनाची होणार मदत : या सर्व संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर मराठवाड्यात हजारो वर्षांपूर्वी असलेलं मुबलक पाणी पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये उपलब्ध करून देता येण्यासाठी उपयोग होणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. शासनानं सुद्धा याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. शासनाचा सर्वाधिक खर्च दुष्काळग्रस्त भागांमध्ये होत आहे. तो खर्च सुद्धा शासनाला कमी करता येणार आहे. या संशोधनातून पर्यावरणाचा इतिहास, मराठवाड्याचा इतिहास, मराठवाड्यात एकेकाळी वन्यप्राणी, वनस्पती आणि जंगल मुबलक प्रमाण होते, हे यावरुन सिद्ध होत असल्याचाही दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.
संशोधनात आढळला पाणघोड्याचा जबडा : या संशोधकांनी 2016 ला लातूर जिल्ह्यापासून 20 किलोमीटर लांब असलेल्या रेनापूर आणि 13 किलोमीटर लांब हारवाडी जवळ हे संशोधन केलं आहे. हा परिसर मांजरा नदीपात्राचा भाग आहे. नदीपात्रात कुठलंही पाणी नसताना या संशोधकानी संशोधन केलं असून, त्यात सापडलेल्या अवशेषानुसार शास्त्रज्ञ सुद्धा थक्क झाले. या दुष्काळग्रस्त भागात पाणीच नाही म्हणतात, त्या भागात पाण्यात राहणारे सगळे जीवाश्मांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावर आता पुढील संशोधन सुद्धा सुरू असल्याचं संशोधक डॉक्टर विजय साठे यांनी सांगितलं आहे. या संशोधनात पाणघोड्याचा पूर्ण जबडा सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचं पाणघोड्याच्या जबड्याचं वय तब्बल 23 हजार वर्ष असल्याचं संशोधक विजय साठे यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळं पाणी नाही म्हणून ओरड करणारा मराठवाडा, दुष्काळग्रस्त भाग होता, हे जरी आपणाला माहीत असलं, तर एकेकाळी हा भाग सुद्धा सुजलाम सुफलाम होता. हे संशोधन आणखी पुढं असंच सुरू असणार असल्याची माहिती संशोधक विजय साठे यांनी दिली असून यापुढं आणखी खुलासे होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा :