पुणे (बारामती) - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या माजी सरपंच जयदीप तावरे यांची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. पुण्याच्या मोक्का न्यायालयाने तावरे यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर त्यांना दुग्धाभिषेक घालत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा - धक्कादायक : ऑनलाइन क्लास सुरू असतानाच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ; त्यानंतर घडला 'हा' प्रकार...
३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींना जेरबंद केले होते. मात्र, काही दिवसांनंतर रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी या प्रकरणी जयदीप तावरे यांना अटक केली होती. त्यानंतर माळेगावातील ग्रामस्थांनी जयदीप तावरे यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवले होते. गावचे राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले होते. अखेर पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची कसून चौकशी केली असता या प्रकरणात जयदीप तावरे यांचा संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, सदर प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तसा अहवाल मोक्का न्यायालयात सादर केला. त्यानुसार जयदीप तावरे यांना जामीन मंजूर झाला. अॅड. हर्षवर्धन निंबाळकर, अॅड. धैर्यशील जगताप यांनी जयदीप यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली.
हेही वाचा - राज्य मागासवर्गीय आयोगाचा जातिनिहाय जनगणना करण्याचा ठराव - न्यायमूर्ती आनंद निरगुडे