पुणे - कडक उन्हाळ्यात रानावनात भटकणाऱ्या पाखरांच्या दानापाण्याची सोय व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील शिळेश्वर येथील मारुती किसन मेंगडे या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतातील ज्वारीचे उभे पीक पाखरांच्या खाद्यासाठी खुले केले. याशिवाय शेतात एक खड्डा तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांच्या शेतात सकाळ, संध्याकाळ पाखरांचा किलबिलाट वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या या दिलदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या शेततळी, पाणवठे, तलाव, विहिरी यांनी तळ गाठला आहे. त्यात कडक उन्हामुळे पक्षांना भूक मिटवण्यासाठी अन्नधान्य व पाणीही मिळत नाही. यासाठी कडक उन्हातही त्यांना मैलोनमैल भटकंती करावी लागते. माणूस आपल्या गरजा कशाही पूर्ण करू शकतो, पण या पाखरांचे काय? असा प्रश्न मारुती मेंगडे यांना अनेक दिवसांपासून सतावत होता. यासाठी त्यांनी एक एकर परिसरातील ज्वारीचे पीक खुले केले आणि पक्षांच्या अन्नधान्य व पाण्याची सोय केली आहे.
मारुती मेंगडे यांच्या या निर्णयामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी पक्षांचे थवेच्या थवे त्यांच्या शेतातील ज्वारीच्या उभ्या पिकावर तुटून पडतात. चिमण्या, कावळे, मैना, पोपट, कबुतरे यासारखे असंख्य पक्षी अन्न व पाण्यासाठी येत असल्याने दिवसभर त्यांच्या शेतात पक्षांचा किलबिलाट वाढला आहे.