पुणे - भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग शुगर मिल, बचत गट आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आंबेगाव व शिरुर तालुक्यात जनावरांसाठी सहा चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चारा छावणीची पाहणी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली.
उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तर जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर आहे. यामुळेच या छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जनावरेही मोठ्या संख्येने छावणीत दाखल झाली आहेत.
आंबेगाव आणि शिरुर यांची शेतीप्रधान तालुके म्हणून ओळख आहे. या परिसरातील नागरिक शेतीबरोबर दुग्धउत्पादन व्यवसाय मोठ्या संख्येने करतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात चार ते पाच जनावरे आहेत. सध्याच्या परिस्थितीत या जनावरांच्या चा-यासह पाण्याचे मोठे संकट उभं राहिले आहे. त्यामुळेच आता जनावरांचे पालकत्व स्विकारुन चारा छावणी सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सध्या कडाक्याच्या उन्हाबरोबर उकाडाही वाढला असल्याने नागरीजीवन विस्कळित होत असताना जनावरांचे हाल होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी उभ्या राहत असलेल्या या छावण्या जनावरांसाठी संजीवनीच आहेत.