पुणे - जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील एका शेतकऱ्याने सेवानिवृत्तीनंतर पन्नास वर्षांपासून पडीक पडलेल्या माळरानाला शेती उपयोगी तयार करून अस्टरच्या विविध रंगाच्या फुलांनी शेती फुलवली आहे. या फुलशेतीतून आता लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे विठ्ठल नलावडे यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील विठ्ठल नलावडे (25) नोकरीनिमित्त कामाला होते. मागील वर्षी विठ्ठल नलावडे यांनी मुंबईतील नोकरीची सेवानिवृत्ती झाल्यानंतर वडिलोपार्जित असलेली माळरानावरील पडीक जमीन शेतीसाठी तयार केली. मात्र, सध्याचे शेतमालाचे पडलेले बाजारभाव, अवकाळी पाऊस, पसरलेली रोगराई यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यावर पर्याय म्हणून विठ्ठल नलावडे यांनी पडीक माळरानावर तयार केलेल्या शेतीत अस्टरच्या फुलांची लागवड केली.
नलावडे यांनी आपल्या माळरानावरील पाच एकर शेती अस्टरच्या फुलांची लागवड केली. यामध्ये मजुरांची टंचाई लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊन शेतात मेहनत सुरू केली. फुलशेतीला माळरानावरील मोकळी हवा, पोषक वातावरण, यामुळे माळरानावर अस्टरची फुलशेती विविध रंगाच्या फुलांनी फुलली आहे आणि या फुलांचे चांगले उत्पादन मिळत असून बाजारातही चांगली मागणी आहे. यातून सध्या लाखोंचे उत्पादन मिळत असल्याचे विठ्ठल नलावडे यांनी सांगितले. विठ्ठल नलावडे यांनी सेवानिवृतीनंतर आपल्या कुटुंबासमेवत शेतीच्या कामात व्यस्त आहे. त्यात कुटुंबाची मेहनत, जिद्द यामुळे डोंगरमाळरानावरही फुलांची शेती फुलवली आहे.