पुणे - पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या पुष्प प्रदर्शनाला १७ जानेवारीपासून सुरुवात झाली. यंदाचे हे २३ वे पुष्प प्रदर्शन आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एम्प्रेस गार्डनमध्ये शुक्रवारपासून पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली. या प्रदर्शनात जपानी पद्धतीच्या पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांच्या प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे प्रदर्शन १७ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत असणार आहे. या प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्यांची आकर्षक मांडणी, मनमोहक फुलांची मांडणी, पाने-फुले वापरून तयार केलेल्या विविध पुष्प रचना, तसेच विविध प्रकारचे प्रदर्शनीय स्टॉल्स या गोष्टींचा प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे. पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रदर्शन पाहण्यास आलेल्या पुष्प रसिकांना विविध प्रकारच्या पाना-फुलांच्या कुंड्या, बागकामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, औषधे, खते, इ. वस्तू देखील येथील स्टॉल्सवर उपलब्ध होत आहेत. पुष्प प्रदर्शनामध्ये यावर्षी देखील मुख्य आकर्षण असलेल्या विविध प्रकारच्या जपानी पद्धतीच्या पुष्परचना, बोन्साय वृक्ष पुष्प रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.
हेही वाचा - आता पुणे मेट्रो धावणार 'कात्रज ते पिंपरी-चिंचवड'
यानिमित्ताने शोभिवंत कुंड्या, विविध पाना-फुलांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पुष्प रचना, आपल्या बागेत फुलणारी फुले प्रदर्शनात मांडून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देखील पुष्प रसिकांना उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा - पुणेकरांसाठी खुला झाला इवल्याशा काडीपेट्यांचा भलामोठा दुर्मिळ खजिना