पुणे - सरकारने तातडीने निर्णय घेऊन पूरग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. या महापुरात शेती उद्धवस्त झाली असून, पशुधनाचे मोठे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करत असून, आमदार आणि खासदार एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देणार असल्याचेही पवार म्हणाले.
पूरग्रस्त भागातील पाणी आटल्यानंतर तेथील ताबडतोब पंचनामे करावेत. आजपर्यंत कधी आला नाही असा महापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये आला आहे. पुरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर जमिनीवरील माती वाहून गेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपीचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अनेक पूर पाहिले मात्र, याआधी असली परिस्थिती मी कधीच पहिली नसल्याचे पवार म्हणाले. सरकारने तातडीने निर्णय घेऊन या भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, असेही पवार यावेळी म्हणाले.
शासकीय यंत्रणा कमी पडली आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. मात्र, प्रशासन कमी पडले ते का? यावर खोलात जाऊन विचार करावा लागेल. सर्वच राजकीय पक्षांनी ऐकमेकांची उणीदुणी न सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन पवार यांनी केले. मदत करण्यासाठी राज्य सरकार कमी पडत असले तर केंद्र सरकारने मदत करावी. राजकीय टीका टिप्पणी न करता त्यापेक्षा लोकांना कशी मदत करता येईल, हीच आमची भूमिका असल्याचेही पवार म्हणाले.