बारामती (पुणे) - ऊसदर आंदोलनादरम्यान २०१२ साली नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य २७ जणांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रथम वर्ग न्यायाधीश ए. एस. गिरे यांनी हा निकाल दिला.
२०१२ मध्ये पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढत राजू शेट्टी व सदाभाऊ खोत या जोडीने बारामतीत ऊसदरासंबंधी मोठे आंदोलन केले होते. एका टप्प्यावर हे आंदोलन अत्यंत उग्र बनले. त्यातून उस गाड्यांचे टायर फोडणे, ऊस वाहतूकदारांचे नुकसान करणे, भडक भाषण, हिंसक कृत्ये आदी बाबींना जबाबदार धरत त्यांच्यावर बारामतीत गुन्हे दाखल झाले होते.
हेही वाचा - विखारी वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करा - चंद्रकांत पाटील
गुन्ह्यात दाखल झालेल्यांंची नावे
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी, सदाशिव ऊर्फ सदाभाऊ रामचंद्र खोत, रंजन कुमार शंकरराव तावरे, मधुकर जगन्नाथ मुळीक, जनार्दन मारुती झांबरे, संजय वसंतराव गावडे, नितीन विठ्ठल गावडे, किरण सुरेश गायकवाड, सुनिल तुकाराम खलाटे, राजेंद्र शंकरराव ढवाण पाटील, गणपत शंकरराव तावरे, विलास ऋषिकांत देवकाते, अविनाश दत्तात्रय भोसले, विकास गणपत तावरे, हरिभाऊ बबन घोडके, दत्तात्रय बबन सनगर, राजेंद्र सखाराम बुरुंगले, मधुकर विठ्ठल तावरे, शशिकांत मल्हारराव तावरे, तुकाराम पांडुरंग गावडे, विलास नारायण सस्ते, राजेंद्र नानासो सस्ते, शामराव बाजीराव सस्ते, शशिकांत जगन्नाथ कोकरे, लक्ष्मण बबन जगताप, सोपान गेनबा देवकते, रामदास तुकाराम आटोळे यांचा समावेश होता.
मंगळवारी शेट्टी, खोत यांच्यासह २७ जणांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे अॅड. राठोड यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड राजेंद्र काळे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. शामराव कोकरे, अॅड. मिथुन सस्ते यांनी सहकार्य केले.
हेही वाचा - एल्गार परिषदेचे आयोजक कोळसे-पाटील यांच्यावर कारवाईची ब्राह्मण महासंघाची मागणी