इंदापूर (पुणे) - शेततळ्यात विषारी औषध टाकून तब्बल “पाच टन” मासे मारल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील शेलार पट्टा या ठिकाणी उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेतकरी सुखदेव केवटे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समाजकंटकाने केले शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखाचे नुकसान -
इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावात शेतकऱ्यांनी शेततळी तयार केली आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्यबीज सोडले आहे. मात्र, हा मत्स्यव्यवसाय काही समाजकंटकांना पाहावत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहेत. सुखदेव केवटे यांनी त्यांच्या शेती क्षेत्रात २०० बाय १००चे शेततळे केले आहे. त्या शेततळ्यात केवटे यांनी ८ महिन्यांपूर्वी ३० हजार मत्स्यबीज सोडले होते. आठ महिन्यानंतर मासे मोठे झाले होते. परंतु, रविवारी रात्रीच्या वेळी अज्ञाताने त्यांच्या शेततळ्यातील पाण्यात विषारी औषध टाकल्यामुळे पाच टनाहून अधिक माशांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
हेही वाचा - अभ्यासाचा तगादा लावला म्हणून अल्पवयीन मुलीने केला आईचा खून