पुणे - कोरोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. अशा स्थितीत महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, इतर शहारांतील विद्यार्थी, पोलिसांसाठी वंदेमातरम् संघटना, सरहद काश्मिरी विद्यार्थी संघटना, श्री गुरु गौतममुनी मेडीकल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे मोफत भोजन सेवा शहरातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आली आहे.
संपूर्ण देश कोरोना विरुध्दची लढाई संयमाने आणि स्वयंशिस्तीने लढत आहे. दुकाने, हॉटेल्स उस्फूर्तपणे बंद आहेत. पण, या परिस्थितीत अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडलेले नागरिक, हातावर पोट असलेले समाजबांधव, इतर शहरातून आलेले विद्यार्थी आणि मुख्यत्वे आपले स्वच्छता सैनिक यांचे खाण्याचे हाल होऊ नयेत. यासाठी पुढील काही दिवस दररोज पाच हजार गरजूंना दुपारी साडेबारा ते दोन तसेच संध्याकाळी साडेसात ते नऊ जेवणासाठी फुड पॅकेट्स देण्यात येणार आहेत, अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी दिली.
पुणे शहरातील विविध पंधरा ठिकाणी हे फुड पॅकेट्स देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतादूत, डॉक्टर, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांच्या बद्दल कृतीरुपी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे, अशी माहिती गुरू गौतनमुनी मेडिकलचे ललित जैन यांनी दिली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : पुण्यात पाच ठिकाणी रक्तदान शिबीर; 100 हून अधिक जणांचे रक्तदान