पुणे - मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना रिंगरोड बाधित नागरिकांनी तुम्ही आमच्या घरासाठी का आला नाहीत, असा सवाल करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंकजा मुंडे यांनी संबंधितांना शांत राहण्याचे आवाहन केले. हे राष्ट्रवादीचे जुने धंदे असल्याचे आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटे असतात. या वेळेला हे घड्याळ कायमच बंद करून टाकायचे आहे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. दरम्यान, गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी 5 जणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना अचानक रिंगरोड बाधित नागरिकांनी तुम्ही आमच्या घरासाठी का आला नाहीत असा सवाल केला. तेव्हा, पंकजा मुंडे यांनी संबंधित व्यक्तीला खाली बसण्यास सांगितले. त्यानंतरही तो व्यक्ती बोलतच होता.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादीने सिद्ध केले, की ते निवडणूक हरलेले आहेत. ज्या ठिकाणी हजारो लोक बसले आहेत. तिथे एक व्यक्ती उभा करून बोलवण्याचे हे त्यांचे जुने धंदे आहेत. हे जनता खपवून घेणार नाही. परत संबंधित व्यक्ती आणि महिलेला शांत रहा लोकशाहीमध्ये या गोष्टी असणे अपेक्षित आहेत. असे म्हणत तुम्ही काहीही म्हटलात तरी तुमच्यावर पक्षाची छाप आहे, हे विसरू नका अस मुंडे म्हणाल्या. माझ्या सभांमध्ये लोक पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकाराला मुंडे साहेबांचे सैनिक घाबरत नाहीत. निवडणुकांपर्यंत आपला संयम सोडायचा नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांचे राज्यात विरोधकच शिल्लक नाही, हे वक्तव्य लोकशाहीचा अपमान'
मुंडे पुढे म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात काँग्रेसमुक्त देश तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार केला असून त्या शिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. अहंकार, अतिविश्वास हा राष्ट्रवादीच्या लोकांना आहे, सत्ता म्हणजे आमची मक्तेदारी आहे ती कोणीही मिळवू शकत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला.
हेही वाचा - ...आता फक्त शेती करून चालणार नाही, शेतीला व्यवसायासह नोकरीची जोड हवी - पवार