बारामती : सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राच्या दुचाकीतच अतिविषारी कोब्रा प्रजातीचा साप निघाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथून समोर आली आहे. इथले प्रा.सोपान तात्याराम भोंग यांच्या दुचाकीच्या समोरच्या लाईट बॉक्समध्ये हा साप शिरला होता. भोंग हे स्वतः सर्पमित्र असल्याने त्यांनी यशस्वीपणे या सापाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
असा निघाला साप
याविषयी सविस्तर वृत्त असे की, नेहमीप्रमाणे प्राध्यापक भोंग हे सकाळी त्यांची दुचाकी घेऊन शेतात गेले. गाडी बंद केल्यावर अचानक सापाच्या फुत्काराचा फुस फुस असा आवाज त्यांना ऐकू आला. यानंतर त्यांनी आजूबाजूला गवतात व इतरत्र शोध घेतला असता त्यांना साप आढळून आला नाही. जवळच सापाचा फुत्कार मात्र ऐकू येत होता.भोंग हे स्वतः सर्पमित्र असल्याने त्यांच्या गाडीच्या डिकीत साप पकडण्यासाठी बरणी असते त्यांनी ती भरणी तपासून पाहिले असता बरणीतही साप नव्हता. भोंग यांनी त्यांच्या स्वतःच्या दुचाकीची पाहणी केली असता त्यांना गाडीच्या समोरच्या लाईट बॉक्समध्ये कोब्रा जातीच्या सापाची शेपटी आढळून आली. त्यानंतर त्यांनी सावकाश आपली गाडी गावातील एका गॅरेजमध्ये घेऊन जात स्क्रू ड्रायव्हरने लाईटचा बॉक्स उघडून पाच फूट लांबीच्या सापाला कोणतीही इजा होऊ न देता सावकाश बाहेर काढले व बरणीत भरून सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. पावसाळ्यात साप हे गाडीतील मडगार्ड, पॅनल बॉक्समध्ये शिरतात त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी असे आवाहन सर्पमिञ भोंग यांनी केले.
हेही वाचा - VIDEO : 7 ऑगस्ट - कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य