दौंड - दौंडमध्ये आज पाच जणांचा कोरोना तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम डांगे यांनी माहिती दिली. यातील एक जण स्थानिक असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दौंड राज्य राखीव दलातील जवान राज्यातील विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी जात असतात. बंदोबस्तावरुन आल्यांनतर त्यांचे विलीगीकरण करण्यात येते. राज्य राखीव दलातील एका जवानास कोरोनाची लागण झाली असून भारतीय राखीव पोलीस दलामधील तीन व दौंड शहरातील एका विक्रेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. दौंड शहरामध्ये पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड तालुक्यात अद्याप 30 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून यातील 9 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार असून नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमाचे पालन करून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील दहिटणे येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने कोरोनावर मात केली असल्याचे वृत्त समजल्यावर दौंड करामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नसून तालुक्यात आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने दौंडकरांची चिंता अधिकच वाढली आहे.