पुणे - पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन (Deccan Police Station) येथे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR on Bhaskar Jadhav) करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भास्कर जाधव यांनी टीका केली होती. त्यानंतर पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत योगेश अरुण शिंगटे (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
काय केली होती टीका - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेना पक्षाने काही केलं नाही, असं नारायण राणे म्हणतात, मग तू काय म्हशी भादरत होता का? असा खोचक सवाल भास्कर जाधव यांनी केला होता. त्यांच्या या विधानाविरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार भादवी कलम १५३ अ, ५०५/१, ५०५/२, ५०० व ५०४ नुसार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भास्कर जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा - एका कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी भाषण केले होते. त्यांनी भाषण करताना क्रेंदीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश व आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला देखील निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत जशासतसे उत्तर दिले होते. याप्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले होते. अखेर आज पुण्यात भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.