शिरुर (पुणे) - पुणे शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अनेक स्तरावर कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीही ग्रामीण भागात नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे गांभीर्याने पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. मात्र, याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शिरूर शहरालगत असणाऱ्या एका रहिवासी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व नऊ शिक्षक, अशा एकूण ५७ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे.
याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली. या माहितीनुसार तो रुग्ण आढळल्याने या शाळेतील मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना झालेल्या मुलींना शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहून येत असल्याने प्रार्दुभाव झाल्याची माहिती समजली आहे.
शिरूर येथील निवासी शाळेतील मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. तसेच एकास त्रास होत असलेल्या त्या मुलीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना त्या शाळेत क्वारंटाईन केले असून गोळ्या औषधे देण्याचे काम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले.
शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली. शाळेच्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध
हेही वाचा - बारामतीची प्रज्ञा काटे कोरोना रुग्णांचा ठरतेय आधारवड..!