पुणे - गेल्या 24 तासात कोरोनामुळे पुण्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 60 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला असून त्यांचा कोरोना अहवाल रात्री उशिरा आला होता. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर एका 69 वर्षीय महिलेचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
60 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. त्यांची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांचा शुक्रवारी (दि.3 एप्रिल) रात्री घरीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ससून रुग्णालयातच शनिवारी (दि. 4 एप्रिल) 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे या 69 वर्षीय महिलेला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट रुग्णालयात 30 मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे या ठिकाणी उपचार न करता औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळ उपचारदरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - #coronavirus : पिंपरी-चिंचवडमधील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा २१