पुणे - जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातून बाप मुलाच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मुलाने केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी गावात ही घटना घडली. रमेश विठ्ठल जोरकर (वय 55)असे मृत्यूमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. तर याप्रकरणी मारहाण करणारा मुलगा प्रकाश रमेश जोरकर (वय 29) याला पोलिसांनी अटक केली. 25 नोव्हेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.
जेवणाच्या ताटावरून झाला वाद -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी मुलगा मित्रांसोबत घराबाहेर आला आणि त्याने पत्नीला जेवणाची ताटे घराबाहेर घेऊन ये असे सांगितले. यावर घरात बसलेल्या रमेश जोरकर यांनी तो काय जहागीरदार आहे का? घरात येईल आणि ताटे घेऊन जाईल असे म्हणाले. याच कारणावरून बापलेकात वाद झाला.
वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
यावेळी प्रकाश याने वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पत्नी आणि आईने प्रकाशला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न जुमानता आरोपीने वडिलांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रमेश जोरकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. वेल्हा पोलिसांनी या प्रकरणी प्रकाश जोरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - देशात 4 लाख 46 हजार सक्रिय कोरोना रुग्ण; तर रिकव्हरी रेट 93.81 टक्के
हेही वाचा - स्मरण दिन : 'केमिकल वॉर' म्हणजे काय? जगभरातील युद्ध पीडितांचं स्मरण