पुणे - जुन्नरच्या राळेगण गावात ट्रॅक्टर अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला तर, चालक जखमी झाला. कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोपान उंडे सुट्टी घेऊन कुटुंबासह आपल्या गावी आले होते. पाडव्याच्या दिवशी त्यांनी नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. शनिवारी या ट्रॅक्टरचा अपघात झाला.
शनिवारी दुपारच्या वेळेस सोपान उंडे हे त्यांचा मुलगा तेजस व घंगाळदरे येथील चालक संदेश तळपे यांना घेवून शेतीच्या मशागतीची कामे करत होते. शेतात मशागतीसाठी जात असताना तीव्र उभी चढण व जागेवर वळण असल्याने चालक संदेश तळपे याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर वीस फूट खोल असलेल्या दुसऱ्या शेतात पडला. एक पलटी मारून ट्रॅक्टर पुन्हा उभा झाला. यावेळी ट्रॅक्टरचे हूड चेपून त्यात सोपान उंडे व चालक अडकून पडले. मुलगा तेजस तिथेच जमिनीवर पडला. हा ट्रॅक्टर तसाच सुरू राहून सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत गेला व बांधाला धडकून थांबला. त्यात उंडे पिता-पुत्राचा मृत्यू झाला. दरम्यान, ट्रॅक्टर हा छोटा असल्याने व त्याला जोडलेल्या रोटरचे वजन जास्त असल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.