पिंपरी-चिंचवड (पुणे) - पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून मित्राच्या मदतीने तीन वर्षीय मुलाचे अपहरण वडिलांनीच केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित वडील आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपींना जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुकल्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. अपहरणाचे प्रकरण असल्याने पोलिसांनी गुप्तता बाळगली तसेच गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवण्यात आली. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. काही तासांमध्येच अपहरण केलेल्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले. मात्र, तो पुण्यातील एका खासगी रुग्णालयात लपून बसला असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून मुलाचे अपहरण केल्याचे समोर आले.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोरोनाकाळात फळविक्रीत 40 टक्क्यांची घट.. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
वडील आणि तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला पोलिसांनी पुण्याच्या उरली कांचन येथून ताब्यात घेतले. दरम्यान, तीन वर्षीय चिमुकल्याला पोलिसांनी आईच्या स्वाधीन केले तर इतर दोन्ही आरोपींना वाकड पोलिसांकडे सोपविण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद. सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली.