बारामती- आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल कसे निवडून आणता येईल. याबाबत तेराही तालुक्यातील प्रमुख एकत्रित बसून चांगल्या प्रकारचा मार्ग काढू. जसे की, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंतचे पिककर्ज होते. ते आता पाच लाखापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बचत गटांना कमी व्याजाने कर्ज -
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, पुणे जिल्हा बँकेचा ढोबळ नफा पावणे तीनशे कोटी रुपये झाला. या ढोबळ नफ्यातून वेगवेगळी तरतूद करून पंचावन्न कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे पवार यांनी सांगितले. बँक आपली आहे. नफा मिळवणे हे उद्दिष्ट नाही. मिळालेल्या नफ्यातून शेतकरी महिला बचत गट तसेच ज्या साखर कारखान्यांच्या व्याजावर बँक चालते. त्यांना कमी व्याजाने कसे वितरित करता येईल याचाही निर्णय केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अवैद्य धंदेवाल्यांना पवारांचा इशारा -
झटपट श्रीमंत होण्यासाठी गैर मार्गाचा अवलंब करू नका. याची टोपी त्याला त्याची टोपी याला असल्या भानगडी करू नका. चुकीच्या रस्त्याने जाऊ नका, चुकीचा विचार करू नका, अवैद्य व्यवसाय करू नका, अन्यथा पोलिसांकडून तुमचा बंदोबस्त केला जाईल. कोणाचीही हायगय केली जाणार नाही. असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
विरोधकांकडून खाजगी कारखान्याचे समर्थक असल्याची आवई उठवली जातेय -
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मागील काळात विरोधकांनी कारण नसताना आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक आहोत, पाठीराखे आहोत, अशी आवई उठवली. आता ही काहीजण शरद पवार आणि माझा तसूभरही संबंध नसताना पारनेरचा साखर कारखाना भाजपाच्या काळात माजी खासदार दादासाहेब नवले यांनी स्वतःसाठी खरेदी केला. मात्र एकतर्फी बातमी ऐकल्यानंतर तुमच्यासारख्या सुज्ञ मतदारांचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विरोधकांनी काही साखर कारखाने चालून दाखवावेत -
पुढे बोलताना पवार म्हणाले की, अनेक जण असे म्हणतात की आमचा कारखाना चालविण्यासाठी चांगल्या विचारांची माणसे द्या. प्रेरणा व नाशिक कारखान्यासह राज्यातील 13 कारखाने चालविण्यासाठी टेंडर निघाले. जे काही कारण नसताना कारखान्याबाबत चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माझे आव्हान आहे की, विरोधकांनी काही कारखाने चालवायला घ्यावीत ती चालून दाखवावीत मग तेव्हा समजेल कारखाना चालवणे किती मुश्कील काम आहे.
हेही वाचा - मेहरबानी करून जीवनात कधीच कोर्टाची पायरी चढू नका, अजित पवारांचा मोलाचा सल्ला