पुणे - दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता हाच कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्याच्या २३ पिशव्यांचे १ लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. मात्र, इतर शेतकऱ्यांच्या कांद्याला हा भाव मिळेल का? याप्रश्नासह शेतमालाला योग्य बाजारभाव देऊन कर्जातून मोकळे करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राबणारा कष्टकरी बळीराजा हा शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला होता. त्यातून दुष्काळी संकट व परतीच्या पावसाने उभी पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला शेतमाल पाण्यात गेल्याने या शेतकर्यांवर मोठा कर्जाचा बोजा उभा राहिला. मात्र, सध्या कांद्याला सोन्याचे भाव आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिरूर तालुक्यातील तांदळी गावातील मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याला त्याच्या कांद्याच्या २३ पिशव्यांचे १ लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे.
पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. तसेच या पिकाला मोठा भांडवली खर्चही करावा लागतो. मात्र, कांदा काढणीच्या वेळी त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. शेतकरी कर्जबाजारी होतो. हा शेतकरी आता कर्जबाजारी होत चालला आहे, तर दुसरीकडे साठवणुकीत ठेवलेल्या कांद्यातून काही शेतकरी लखपती होत चालले. मात्र, पुढील काळात शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - इथिओपियाचा सोलोमन 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा उजाळल्या आहेत. शेतात कबाडकष्ट करून शेतीला शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नेहमीच शेतकरी तोट्यात जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हा प्रश्न सुटणार नाही. मात्र, शेतमालाला हमी भाव दिला तर शेतकरी कायमस्वरुपी उभा राहील, असेही शेतकरी सांगतात. त्यामुळे फक्त कर्जमाफीने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही तर, शेतमालाला योग्य बाजारभाव देऊन त्यांना कर्जातून मोकळे करा, अशी विनंती शेतकरी करत आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज ऐकून महाविकास आघाडीचे सरकार पुढील काळात काय भूमिका घेते? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा - पुणे: नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची फसवणूक; चार जणांना अटक