बारामती (पुणे) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेऱ्या संचार बंदीत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट बांधावर खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत ४४ लाख ६३ हजार ८५२ रुपये किमतीची खते शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर देण्यात आली आहेत. या योजनेचा २४३ शेतकरी गटांच्या माध्यामातून तालुक्यातील १ हजार ३८९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
कोरोना महामारीने अगोरदरच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. टाळेबंदी व संचारबदी लागू असल्याने यंदाचा खरीप हंगाम बी-बियाणे व खतांवाचून वाया जाऊ नये तसेच निविष्ठा खरेदी दरम्यान संचारबंदी नियामवलीचे पालन न झाल्यास कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता होती. हे ओळखून कृषी विभागाच्या आदेशाने शेतकऱ्यांना थेट बांधावर खते पोहोच करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार, बारामती तालुक्यातील बारामती, सुपे, वडगावनिबांळकर, उडंवडीसुपे, या ४ मंडळातंर्गत असणारे सर्व शेतकरी गट तसेच ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून खत हवे होते, अशा शेतकऱ्यांचे गट तयार केले. प्रत्येक गटामध्ये सुमारे २० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी खते व बियाणे यांची मागणी गट प्रमुखांकडे नोंदवल्यानंतर सदर गट प्रमुख कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करत असल्याने कृषी सेवा केंद्रात होणारी गर्दी टळली. तसेच या प्रक्रियेवर थेट कृषि विभागाचे नियंत्रण असल्याने जादा दराने होणाऱ्या खत विक्रीला आळा बसला. शिवाय शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह खते मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
निविष्ठा खरेदीत पारदर्शकता-
यंदाच्या खरीप हंगामात निविष्ठा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच खत खरेदीत पारदर्शकता येण्यासाठी त्या-त्या गावातील खत विक्रेता, कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३१ मे २०२० पूर्वी खरीपाच्या पेरण्या सुरू होण्याआधी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा होणार आहे.
मंडळ शेतकरी गट खते (टनामध्ये) रक्कम
बारामती ६१ ८४ ९,८१,३६५
सुपे ७२ ५७ ८,०५,९३६
उडंवडी सुपे ४० ९१ १२,१७,६७३
वडगाव निं ७० ८० १४,५८,८७८
एकूण २४३ ३१२ ४४,६३,८५२
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राबवलेल्या बांधावर खत या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. खत खरेदीसाठी गर्दी करु नये. शेतकरी गटांकडूनच शेतकऱ्यांनी खत खरेदी करावे. जादा दराने खत विक्री होत असल्यास तशी माहिती कळवावी, असे बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले आहे.