पुणे - दौंड तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे डाळींबाच्या बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळांवर डाग दिसत आहेत. अशा फळांना बाजारात कवडीमोल भाव मिळणार असल्याने शेतकरी बहर सोडण्याचा विचार करत आहेत. निसर्गाच्य लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
दौंड तालुक्यातील अनेक शेतकरी डाळींबाची लागवड करतात. बहर चांगला यावा यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. यंदा पाऊस जास्त झाल्याने शेतातील झाडांवर अधिक काळ पाणी राहिले. त्यामुळे डाळींब बागांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुरशी नाशकांचा वापर केला तरी सतत पाऊस पडत असल्याने ते धुवून गेले.
हेही वाचा - परतीच्या पावसाचा फटका; भाज्यांना महागाईची फोडणी, गृहिणींचे बजेट कोलमडले
डाळींबाच्या फळांवर पांढऱ्या बुरशीचे डाग पडले आहेत. बाजारात अशा फळाला भाव मिळत नाही. बुरशीमुळे डाळींबाचा बहर सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हातातोंडाशी आलेले पिक सोडावे लागत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.