पुणे : अत्यंत असंवेदनशीलपणे हे प्रकरण सरकार हाताळत आहे. अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश अजूनही सरकारपर्यंत पोहचत नाही. नुकसान होऊन 10 ते 12 दिवस झाले तरी पंचनामे होत नाही. हे लोक काय पंचनामे करतील? काय वास्तव मांडतील? असा प्रश्नही त्यांनी विचारला. राज्य शासन शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. एवढे संवेदनशील विषय असताना सरकार कुठे यात्रा काढत आहे. तर कुठे काय करताना दिसत आहे, अशी टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे. पुण्यात आज साखर आयुक्त यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले राहुल गांधींबाबत - राजू शेट्टी यांना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधीच नाही कोणावरही जाहीर सभेमध्ये वक्तव्य केले आणि ते असंवैधनिक होत असेल किंवा खोटे वक्तव्य होत असेल किंवा या आरोपाखाली सदस्यत्व रद्द होत असेल तर आम्हा शेतकऱ्यांना जी वारंवार आश्वासने देण्यात आली आहे. त्यांचे काय झाले, असे ते म्हणाले. फक्त राजकीय कारणाने खासदारकी रद्द झाली आहे, असेही यावेळी राजू शेट्टी म्हणाले.
'त्या' मुकादमांची काळी यादी बनवा : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली. यात राज्यात जे ऊसाची वाहतूक करणारे वाहतूकदार आहेत ते सामान्य शेतकरी आहेत. ऊस तोडणीसाठी यांना बाहेरून मजूर हे आणावे लागतात. हे मजूर पुरवणारे जे मुकादम असतात त्यांच्याशी एप्रिल किंवा मे मध्येच यांचा करार झालेला असतो. या करारावरच विविध बँकेतून कर्ज काढले जाते. त्या मुकादमाला 20 ते 25 लाख रुपये बिनव्याजी दिले जातात. असे असताना देखील काही मुकादम हे जाणून-बुजून पळून जातात आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करतात. यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतो. राज्यात 448 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून साखर आयुक्तांनी अशा मुकादमांची काळी यादी जाहीर करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली.
'एफआरपी'ची चौकशी करा : राज्यात ऊसाचा हंगाम सुरू असून राज्यातील कारखाने हे जवळपास बंद झाले आहेत. राज्यात 200 पैकी 145 साखर कारखाने सुरू आहेत. 55 कारखाने हे बंद पडले आहेत. येत्या 8 ते 10 दिवसांत तेही बंद होणार आहेत. सध्या 92 टक्के ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली असल्याचे शासन सांगत असले तरी कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपी मिळालेली नाही. याची चौकशी करावी, अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना केली आहे.