(शिरुर) पुणे- सफरचंदाच्या लागवडीसाठी काश्मीर प्रसिद्ध आहे. मात्र, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मुखई येथील अभिजित धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंद लागवडीचा प्रयोग केला, त्यामध्ये त्यांना यश आले आहे. धुमाळ यांनी दोन वर्षांपूर्वी हर्मन-९९ या जातीच्या सफरचंदाची लागवड केलेल्या सफरचंदाला सध्या तिसऱ्या वर्षी फळे लागली आहेत. कमी श्रमात, कमी पाण्यात, शिरुर तालुक्यातील वातावरणात चांगले पीक म्हणून सफरचंद चांगला पर्याय असून शेतकऱ्यांनी आवर्जून लागवड करावी, असे आवाहन अभिजित धुमाळ यांनी केले आहे.
शिक्रापूर जवळील मुखई गावचे अभिजित प्रल्हाद धुमाळ व अतुल प्रल्हाद धुमाळ या दोन बंधूंची प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख आहे. अभिजित शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. ऊसाच्या सर्व वाणांची बियाणे बनवण्यासाठी त्यांची सर्व राज्यात ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सफरचंद लागवडीचा विचार केला आणि कामही सुरू केले.
हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातील शेतक-यांचे फोन नंबर मिळवून त्यांनी संपर्क सुरू केला व इंटरनेटवरुनही अनेक माहिती संकलित केली. तब्बल सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी हर्मन-९९ हा सफरचंदाचा वाण निवडला. सिताफळासारख्याच पध्दतीने सफरचंदाची लागवड १२ फूट लांब व १२ फूट रूंद या अंतराने पाऊण एकरात साधारण २०० झाडांची लागवड केली. यासाठी त्यांनी कुठलेच वेगळे खत वापरले नाही. वेगळी मशागत करावी लागली नाही, असा अनुभव आल्याचे अभिजित धुमाळ यांनी सांगितले आहे.
सफरचंद पिकाला 200 तास थंड हवेची गरज
सफरचंद पिकासाठी वर्षभरात साधारण २०० तास थंड स्वरुपाची सलग हवा लागते. त्यानुसार पुणे जिल्ह्यात ८०० तास सलग थंड हवा मिळत असल्याचे अभिजित धुमाळ यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळले. मुरमाड व अगदी सुमार प्रतीची जमीन या पिकाला ठिक राहते. कमाल ४५ अंश सेल्सीअसलाही हे पीक तग धरते. एकदा लावले की, लाईफ-टाईम उत्पादन असे सिताफळासारखेच अनेक गुण असलेले हे पीक पुणे जिल्ह्यासाठी वरदान असल्याचे धुमाळ यांचे मत आहे.
हिमाचल प्रदेशातून मागवली रोपे
हर्मन-९९ या जातीच्या रोपाची निवड केल्यानंतर धुमाळ यांनी हिमाचल प्रदेशातून ८० रुपये प्रती रोप अधिक २० रुपये कुरिअर चार्ज या प्रमाणे धुमाळ यांनी २२५ फळझाडे मागवली. २२५ रोपांची लागवड दोन वर्षांपूर्वी केली. सध्या अनेक झाडांना फळे लागली आहेत. लागवड केल्यानतंर तिस-या वर्षी प्रत्येक झाडाला २० ते २५ किलो एवढा सफरचंद माल मिळत असून आणखी दोन वर्षांनी हेच उत्पादन ३५ ते ४० किलो आणि आठ वर्षांनंतर १०० किलो प्रतिझाड एवढे उत्पादन निघण्याचा अंदाजही धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.
साधारण १०० ते १५० रुपये किलो या प्रमाणे धुमाळ यांनी काही सफरचंद स्थानिक बाजारपेठेत विकली असून काश्मीर पेक्षाही गोड, रसाळ आणि मधाळ फळे आपली असल्याचा दावा धुमाळ यांनी केला आहे. अर्थात हा दावा करताना त्यांनी सफरचंदाची तुलना सिताफळाशी केली असून कमी श्रमात, कमी पाण्यात,या वातावरणात चांगले पिक म्हणून सफरचंद आवर्जून लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.