पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या मुलींना घेऊन जाण्यासाठी शासकीय आरोग्य कर्मचारी आले असता, मुलींना कोरोना झाला नाही, असे सांगत त्यांना घेऊन जाण्यास कुटुंबियांनी विरोध केला. ही घटना शनिवारी (दि. 25 जुलै) घडली असून आज (दि. 26 जुलै) संबंधित मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यास नकार दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळतो की नाही, यासाठी प्रत्येक क्वारंटाईन सेंटरवर स्वतः आयुक्त लक्ष ठेऊन असतात. दरम्यान, देहूरोड परिसरात प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पारशी चाळ येथे एका कुटुंबातील दोन मुली कोरोना बाधित आढळल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास आरोग्य कर्मचारी गेले असता आमच्या मुली कोरोना बाधित नाहीत म्हणून कुटुंबियांकडून विरोध करण्यात आला. यामुळे शनिवारी कर्मचारी हे रुग्णाविना परतले होते. मात्र, कोरोना गंभीर असल्याने देहू रोड पोलिसांचा बंदोबस्त मागवून संबंधित मुलींना रुग्णालयात अधिक उपचारासाठी आरोग्य विभागाकडून नेण्यात आले आहे.