पुणे - लॉकडाऊनच्या काळात सगळेजण घरी एकमेकांसोबत मजेत वेळ घालवत असले तरी सर्वांनाच हे सुख प्राप्त होते असे नाही. कौटुंबिक न्यायालयात पोहोचलेल्या पती-पत्नीच्या प्रलंबित दाव्यात मुलांना सुट्टी लागल्यावर त्याचा ताबा मिळावा, यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पालकांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येतात. पण यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे मुलांशी प्रत्यक्ष भेट होणे कठीण आहे. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने पालकांना दिलासा दिला असून मुलांना भेटण्यासाठी आत्ता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पालकांना आपल्या मुलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधने सोपे होणार आहे. एका वडिलांकडे ताबा असणाऱ्या मुलीशी वाढदिवसानिमित्त व्हिडियो कॉलद्वारे संपर्क साधण्याची संधी न्यायालयाने आईला उपलब्ध करून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर अशाप्रकारे संपर्क साधता यावा, यासाठी न्यायालयात आत्तापर्यंत 8 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहे, अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.
घटस्फोटाने आई-वडिलांचे नाते संपुष्टात येते. मात्र, त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. पती-पत्नीच्या वादात मुलांचा ताबा कोणाकडे असेल हा प्रमुख मुद्दा असतो. ताबा कुणाकडे असेल, दुसरा पालक त्याला कधी भेटेल, या बाबी कौटुंबिक न्यायालय ठरवत असते. मात्र, घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर बऱ्याचदा दोघे वेगळे राहत असतात. एका पालकाकडे पाल्याचा ताबा असतो. त्याला भेटण्यासाठी दुसरा पाल्य अर्ज करीत असतो. मुलांना आई-वडील दोघांचेही प्रेम हवे असते. त्याला आई-वडील एकत्र हवे असतात. मात्र, कौटुंबिक वादात त्यांचे बालपण हिरावले जाते. मुलांचा ताबा देताना न्यायालयात विविध बाबी विचारात घ्यावा लागतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा काय आहे, हे पाहताच मुलांचे वय, लिंग, त्याला काही शारीरिक मानसिक आजार आहे का, हे पाहावे लागते. मुलांचा ताबा एक पालकाकडून दुसऱ्या फलकाकडे देताना मुलांच्या मनावर या बदलाचा काय परिणाम होईल, याचा देखील विचार करावा लागतो. मात्र, यंदा कोरोनामुळे पाल्याला प्रत्यक्ष भेटणे कठीण झाले आहेत. पालकांसाठी कौटुंबिक न्यायालयाने नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. न्यायालयाच्या मेलवर व्हिडिओकॉल द्वारे संपर्क साधन्याबाबत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पाल्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधता येणार आहे.