पुणे - येथील मार्केटयार्ड परिसरातील एका घरात 6 सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. या चोरीत चोरट्याने 39 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळविली. तर, अवघ्या 12 तासात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटकेत घेतले असून त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त केला आहे. सदर आरोपी हा फिर्यादीच्या बायकोचा फेसबुक फ्रेंड आहे. निलेश शरद तावरे (29) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील कोंढवा रस्त्यावर एका सोसायटीत ही चोरी झाली होती. घटनेच्या दिवशी फिर्यादीची पत्नी मुलांना शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. याच तासभरात आरोपीने चोरी केली. याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती. दरम्यान, तपास सुरू असताना आरोपीने दरवाजाचे लैच तोडले नसल्याचे दिसले. त्यामुळे यामध्ये बनावट चावीचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही तपासले असता एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी सुरक्षारक्षकांना त्याच्या फोटो दाखवला असता तो यापूर्वी 2 वेळेस फिर्यादीच्या घरी येऊन गेल्याचे समजले.
आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना तो फिर्यादीच्या पत्नीचा फेसबुक फ्रेंड असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत त्याला सातारा येथून ताब्यात घेतले. आरोपी निलेश तावरे हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर यापूर्वी घरफोडी, वाहन चोरीसह 33 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी निलेश तावरे याने फिर्यादीच्या पत्नीशी फेसबुकवरून ओळख वाढवली. त्याने फेसबुकवरूनच फिर्यादीच्या घराविषयी संपूर्ण माहिती गोळा केली. तसेच फेसबुकवरील मैत्रीचा फायदा घेऊन तो दोनदा घरी येऊन गेला. यादरम्यान त्याने घराच्या मुख्य दरवाजाच्या चाव्या चोरून नेल्या होत्या.