पुणे- वनराई संस्थेच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात संस्थेने केलेल्या कामांची माहिती देण्यात आली.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या वतीने पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागात विविध कामे केली जातात. पाणी अडवा पाणी जिरवा, पाणलोट क्षेत्रातील कामे, वनीकरण, सामूहिक शेती अशी कामे वनराई संस्था करते. शैक्षणिक आणि आरोग्याच्या क्षेत्रात संस्था काम करते आहे, याची माहिती प्रदर्शनात देण्यात आली.
संस्थेच्या कामाची माहिती पुणेकर जनतेला व्हावी, या दृष्टिकोनातून वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रदर्शनाचे आयोजन केले, असे वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया म्हणाले. प्रदर्शनामध्ये पाणलोट क्षेत्राची संबंधित कामे कशाप्रकारे होतात, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते.
पाणी अडवून विहिरी, तलाव यांच्या पाण्यात कशी वाढ होते, याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले. सामूहिक शेती, बांधावर झाडांची लागवड आणि जमिनीचा पोत वाढवण्यासंबधी माहिती प्रदर्शनात मांडली आहे. वनराई संस्थेच्या कार्यालयात पदर्शन आयोजित केले होते.