पुणे - भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह पत्नी उषा काकडे यांना मेव्हण्यावर गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. भागीदारीत असलेल्या व्यवसायातून वाद निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
युवराज ढमाले (वय 40) असे तक्रारदाराचे नाव आहे. बुधवारी पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यासाठी चतुःशृंगी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी गेले. मात्र, ते घरी सापडले नाही. त्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी पोलिसांनी काकडे दाम्पत्याला राहत्या घरातून अटक केली. दुपारच्या सुमारास त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात काकडे दाम्पत्याला जामीनही मंजूर करण्यात आला.
काय आहे प्रकरण
युवराज ढमाले हे बांधकाम व्यावसायिक असून माजी खासदार संजय काकडे यांचे मेहुणे आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा संजय काकडे यांच्याशी भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररित्या व्यवसाय करत होते. ऑगस्ट 2018 मध्ये युवराज ढमाले काकडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी काकडे यांनी ढमालेला धमकी दिली होती. तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात युवराजला धमकी दिली होती.