पुणे - पिंपरी-चिंचवडमधील म्हाडा इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला होता. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याप्रकरणी, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, या ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर या घटनेविषयी सर्वप्रथम 'ईटीव्ही भारत'ने बातमी दिली होती. या बातमीची दखल घेऊन, ठेकेदाराचा सुरक्षाविषयक निष्काळजीपणा कामगाराच्या जीवावर बेतल्याने आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याने तुकाराम बाबू मासाळ (वय-४९, रा. बी. जी. शिर्के लेबर कॅम्प) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार अशोक घोसले (वय-२४ रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इतर सहकाऱ्यांसह राजकुमार १८ आणि १९ व्या मजल्यावर क्रेनवर (प्लॅटफॉर्मवर) उभा राहून प्लाष्टर करत होता. तेव्हा, क्रेनचे ब्रेक फेल होऊन राजकुमार इतर सहकाऱ्यांसह खाली पडला. यात दोघे जण जखमी झाले तर राजकुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
राजकुमार आणि इतर दोन सहकाऱ्याने सेफ्टी बेल्ट वापरला होता. मात्र, तरीही ते खाली कसे पडले हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. ठेकेदाराने चांगली सुरक्षा साधने पुरविणे गरजेचे होते. प्लॅटफॉर्मचे ब्रेक तपासणे आणि सुरक्षा साधनांविषयी सांगणे आवश्यक होते. मात्र, या ठेकेदाराने संपूर्ण निष्कळजीपणा केला. म्हणून कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम यांनी फिर्याद दिली आहे.