पुणे - नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर कक्ष स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली.
सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी या 'मुख्यमंत्री सचिवालय कक्षा'तून कामकाज चालणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. विभागाचे महसूल उपायुक्त या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. नायब तहसीलदार आणि लिपिक यांची नियुक्ती देखील या कक्षासाठी करण्यात आली आहे. कक्षाचे कामकाज सोमवारपासून सुरू करण्यात आले.
हेही वाचा - साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने माळेगाव बंद
जनतेकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षात स्वीकारण्यात येणार असून संबंधितास त्याची पोचपावती देण्यात येईल. अर्जावर क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज, निवेदने विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. तसेच शासन स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित अर्ज अथवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही व प्रलंबित अर्जांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे.
हेही वाचा - पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे आंदोलन; मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप