पुणे - संगणक अभियंता तरुणीला एक अज्ञात व्यक्ती मेल आणि व्हॉट्सअॅपवर फोटो आणि मॅसेज करून धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटी कंपनीत ती तरुणी काम करत असून तिचा विवाह जुळलेला आहे. परंतु, अज्ञात व्यक्ती त्यांच्या आयुष्यात संशय निर्माण करण्याचे काम करत आहे. तरुणीच्या आयुष्यातील खासगी फोटो आणि केलेले चॅटिंग हे तिच्या होणाऱ्या पतीला पाठवत आहे. त्यामुळे त्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - श्रीमंत पेशव्यांचे दहावे वंशज राहायचे भाड्याच्या घरात, म्हणाले इतिहासाशी छेडछाड नको
सविस्तर माहिती अशी, की हिंजवडी आयटी हबमध्ये एका कंपनीत ती तरुणी संगणक अभियंता म्हणून काम करते. तिचा नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा झाला आहे. परंतु, अवघ्या दहा दिवसानंतर होणाऱ्या पतीला आणि स्वतः तरुणीला मेल आणि व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असून तरुणीच्या खासगी आयुष्यातील फोटो आणि केलेली चॅटिंग पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा मेल कोठून आला याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत. ज्या व्यक्तीवर संगणक अभियंता तरुणीचा संशय आहे, तो सध्या बाहेरच्या देशात असतो. तर, व्हॉट्सअॅप नंबर हा परराज्यातील असल्याचा समोर आले आहे.
ज्या व्यक्तीवर संशय आहे, त्याच्याबरोबर संगणक अभियंता तरुणीचा विवाह होणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ते दोघे एकमेकांशी बोलत असत. मात्र, काही कारणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर तरुणीचा विवाह जमवण्यात आला. त्यानंतर अवघ्या 10 दिवसातच तरुणीला आणि होणाऱ्या पतीला खासगी आयुष्यातील फोटो आणि चॅटिंग हे मेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येत आहे. तसेच हे फोटो काम करत असलेल्या ऑफिसमध्ये व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. मी दिवस -रात्र शिफ्टला काम करते. त्यामुळे सुरक्षाविषयी भीती वाटत आहे, असे पोलिसांना दिलेल्या अर्जात त्या तरुणीने नमूद केले आहे.