पुणे Electric Vintage Car : प्रत्येकाचं चारचाकी गाडी घेण्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत घेतात. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याचं असंच स्वप्न होतं. मात्र आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं एक अजब शक्कल लढवली. या शेतकऱ्यानं चक्क स्वत:चीच नवी कोरी इलेक्ट्रिक कार बनवली आहे! ही कार बनवण्यासाठी या शेतकऱ्यानं जवळपास अडीच ते तीन महिने मेहनत घेतली. विशेष म्हणजे, ही कार ५-६ तासांच्या चार्जिंगनंतर तब्बल १०० किलोमीटर चालते.
कार घेण्याचं स्वप्न होतं : मावळ तालुक्यातील जांभूळवाडी येथे रोहिदास नवघणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. शेती हा या कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय. शेती म्हटलं की कष्ट आलेच, मात्र मालाला चांगला भाव मिळत नसल्यानं या कष्टाचं चीज होत नाही. या कुटुंबाचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे चारचाकी वाहन घ्यायचं. मात्र गाडी घेण्याइतकी त्यांची ऐपत नव्हती. मात्र रोहिदास नवघणे यांनी मनाशी गाठ बांधली आणि आपलं हे स्वप्न पूर्ण करणारचं असा ठाम निश्चय केला.
अशाप्रकारे बनवली : काही महिन्यांपूर्वी रोहिदास नवघणे दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षा पाहिली. त्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक कार घेण्याचं सुचलं. मात्र त्यांनी बाजारातून कार विकत न घेता आपली स्वत:ची कार तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी आपल्या कुटुंबाला कशा प्रकारच्या गाडीची आवश्यकता आहे, हे निश्चित केलं. त्यानंतर त्यांनी यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्यांनी हळूहळू या कारसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव केली. गावातल्या भंगाराच्या दुकानातून त्यांनी कारसाठी लागणाऱ्या विविध वस्तू जमवल्या. त्यांनी कार बनवण्यासाठी सोशल मीडियाचीही मदत घेतली. विशेष म्हणजे, रोहिदास नवघणे हे फक्त दहावी पास आहेत.
अडीच लाख रुपये खर्च आला : ही कार बनवण्यासाठी रोहिदास यांना सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला. या कारमध्ये त्यांनी ५ बॅटऱ्या लावल्या आहेत. ही कार पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ ५ ते ६ तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही १०० किलोमीटर पेक्षा जास्त धावते. सध्या या कारची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात आहे. जुगाड करून बनवलेल्या या विंटेज कारसोबत फोटो घेण्यासाठी आता लोक गर्दी करू लागले आहेत. रोहिदास नवघणे यांनी आपल्या कुटुंबाचं गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फार मेहनत घेतली आणि जिद्द असेल तर अशक्यातील अशक्य गोष्टही साध्य करता येते हे दाखवून दिलं!
हेही वाचा :