पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या सर्विस रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली. यात चार ते पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
असा झाला अपघात..
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील जांभुळवाडी रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरने एका वाहनाला धडक दिली. यामध्ये चालक आणि क्लीनर अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्याचे काम सुरू असतानाच, रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत पाठीमागे आणखी काही वाहने रांगेत उभी होती. या वाहनांना पाठीमागून आलेल्या आणखी एका कंटेनरने धडक दिली. त्यामुळे पुढील सर्व वाहने एकमेकांवर धडकून हा विचित्र अपघात झाला.
पोलिसांसह सर्वच मदतीसाठी धावले
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस, पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान आणि सिंहगडावरील मंदिराचे सुरक्षा रक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या नागरिकांची सुटका केली. या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर या मार्गावर काहीवेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळीपर्यंत मात्र येथील वाहतूक सुरळीत झाली.
हेही वाचा : पुण्यातील बेपत्ता बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर सापडले