पुणे - ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीला अपघात होऊन एका महिलेसह तीनजण जखमी झाले आहेत. तर, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे ५ च्या सुमारास इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील खार ओढ्यानजीक घडला. भाऊराव उत्तम कांबळे असे मृत मजुराचे नाव आहे.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एक बैलही अत्यवस्थ आहे. त्याच्यावर सणसर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नलगे यांनी औषधोपचार केला.
असा घडला अपघात
उसाचा पुरवठा करण्यासाठी चार बैलगाड्या बारामती इंदापूर मार्गाने इंदापूरकडे जात होत्या. याचदिशेने जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने या चारपैकी एका बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात बैलगाडी पुलावरून खाली पडली. तर, तिच्यासमोर चाललेल्या बैलगाडीलादेखील जबर धक्का बसला. यात बैलगाडीवरील भाऊराव कांबळे हे उसळून थेट टेम्पोच्या चाकाखाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर तीन जण जखमी झाले.
या सर्व गाड्या छत्रपती कारखान्याला उसाचा पुरवठा करत होत्या. त्यामुळे, कारखान्याच्यावतीने मुख्य शेतकीअधिकारी जालिंदर शिंदे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, गॅरेज इन्चार्ज गजानन कदम आदींनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यास मदत केली. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक स्वत: टेम्पो घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
हेही वाचा - पुणे- हायवा टिप्पर मागे घेताना दुचाकीला जोराची धडक; अंगावरून चाक गेल्याने दोन जण ठार