पुणे- महाराष्ट्राच्या भूमीला संतांची, वारकरी संप्रदायाची भूमी म्हणून एक वेगळी ओळख आहे. असे वारकरी संप्रदाय घडवण्यात आळंदी, देहूचा मोठा वाटा आहे. या माऊलींच्या नगरीत वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. येथे असंख्य कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी घडतात. जे पुरोगामी महाराष्ट्रासह, जगभरात प्रबोधनाचे काम करतात.
हेही वाचा- ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा
वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून संताचे विचार समाजापर्यंत पोहचवतात. हे विचार सांगत असताना ते उदाहरणे, दृष्टांत, विनोदाच्या रुपाने मुद्दा समजावून सांगतात. असे कीर्तनकार घडवण्यात आळंदीचा वाटा मोठा आहे. याठिकाणाहून अनेक मोठ-मोठे कीर्तनकार नावारुपाला आले आले असून त्यांनी समाजात प्रबोधनाचे काम केले आहे.
देहू, आळंदी याठिकाणी शंभराहून अधिक शिक्षण संस्था आहेत. त्यात वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. चार वर्षाचे हे शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर हिंदू धर्मातील सर्व ग्रंथाच्या पाठांतरासाठी हे विद्यार्थी शांत ठिकाण जाऊन पाठांतर करतात. कुठलीही गोष्ट मनापासून केली तर ती लवकर आत्मसात होते. आपल्यामध्ये आत्मसात झालेली गोष्ट समाजासाठी उपयोगी आणण्याचे काम खऱ्या अर्थाने कीर्तनकार करतात असे मत येथील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मांडले.
इंदोरीकर महाराजांचे समर्थन
संपूर्ण जगभरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन वेगवेगळ्या माध्यमातून ऐकले जाते. इंदोरीकर महाराज हे समाजप्रबोधनाचे काम करतात. सामान्य कीर्तनकाराच्या प्रबोधनातून दोन, चार लोक वारकरी संप्रदाय स्वीकारतात. मात्र, इंदोरीकर महाराजाचे कीर्तन ऐकून शेकडो लोक वारकरी संप्रदाय स्वीकारतात. त्यामुळे समाजाने त्यांच्यातील दोष पहावे का, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, इंदोरीकर महाराज हे वारकरी संप्रदायाचे सच्चे वारकरी आहेत. त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मत वारकरी संप्रदायाने मांडले.