पुणे : पिंपरी-चिंचवड शहर उद्योग नगरी म्हणून उदयास येण्यात टाटा मोटर्स या कंपनीचे मोलाचे योगदान आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या मंदीच्या काळात चिखली येथील कंपनीत 'ब्लॉक क्लोजर' घेण्यात येत आहे. त्यामुळे या मंदीचा फटका कामगारांना बसत आहे. २८ ते ३१ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर अशा दोन टप्यात मिळवून कार विभागात ८ दिवस 'ब्लॉक क्लोजर' घेण्यात येणार आहे.
या घडामोडींमुळे कामगार चिंतेत आहेत. त्यांना मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. तर काही दिवसांपूर्वी ३० मे ते २९ जून पर्यंत आणि ५ ते १० ऑगस्ट असा ब्लॉक क्लोजर घेण्यात आला होता. आता पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. मोटार उद्योगात येणाऱ्या मंदीमुळे मोटारीच्या विक्रीत घट होत असल्याने त्याचा फटका टाटा मोटर्सला सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. मात्र, काही दिवसांपासून कंपनीमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे जाणकार सांगतात. कार विभागात ३० मे ते २९ जून दरम्यान असा दहा दिवस ब्लॉक क्लोजर होता. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर कंपनीने २८, २९, ३०, ३१ ऑगस्ट असे चार दिवस आणि ३, ४, ५, ६ सप्टेंबर असे चार दिवस मिळून आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे. या सर्व घटनांमुळे कामगार मात्र चिंतेत आहेत.