पुणेः शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. विविध माध्यमातून फसवणूक केल्याचा घटना या शहरात घडत आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावरुन नागरिकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. पण पुण्यात ऑनलाईन आर्थिक सेवा देणार्या इझी पे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्यांच्याकडेच काम करणार्या तब्बल 65 एजंटांनी तांत्रिक सुविधांचा गैरवापर करून तब्बल साडेतीन कोटींचा आर्थिक गंडा घातल्याला प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुख्य एजंट अंकितकुमार अशोक पांडे (वय.20,रा.नवादा बिहार) या एजंटला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अन्य एजंटचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
असा घातला गंडा : याबाबतची अधिक माहिती अशी की, इझी पे या कंपनीचे पुण्यातील येरवडा परिसरात कार्यालय आहे. ही कंपनी भारतात ऑनलाईन पेमेंटची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देते. त्यासाठी कंपनीने भारतभर नोंदणीकृत एजंटची नेमणूक केली आहे. कंपनीने 11 ऑगस्ट 2022 पासून 65 एजंटनी मिळून कंपनीच्या वेब पार्टल अॅपद्वारे अधिकृत यंत्रणेद्वारे कंपनीची फसवणूक केली. कंपनीला गंडा घालण्याच्या उद्देशाने अधिकृत दिलेले मोबाईल सोडून अन्य मोबाईलचा वापर करुन कंपनीच्या व्हीपीए खात्यातून जवळपास 44 बँक खात्यावर एजंटने त्यांचे कमिशन सोडून तब्बल 3 कोटी 52 लाख 70 हजार 210 रुपये ट्रान्सफर करून घेतले. कंपनीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गेल्याची माहिती जेव्हा कंपनीला झाली तेव्हा कंपनीने तपास सुरू केला. कंपनीने तपास केला असता एजंट लोकांनी फसवणूक केल्याचे कंपनीच्या लक्षात आले. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपास सुरू : गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषनाद्वारे संशयित आरोपी एजंट पांडे हा दिल्ली येथे वास्तव्यास असल्याचे समजले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. मात्र आरोपी पांडेने त्याचे ठिकाण बदलले. त्यानंतर पोलिसांनी परत त्याचे वास्तव्य शोधले, तेव्हा पांडे हा पश्चिम बंगाल येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिल्लीतून पोलिसांचे पथक पश्चिम बंगालकडे रवाना झाले. परंतु आरोपीने परत आपले ठिकाण बदलले. आरोपी हा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता. पोलिसांनी शेवटी त्याला बर्धमान जिल्ह्यातील मामरा दुर्गापूर या गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. जवळपास सायबर पोलीस तब्बल 3 महिने या गुन्ह्याचा विविध तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास करत होते. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. कारण या गुन्ह्यातील आरोपी हे भारतातील विविध राज्यातील आहेत. पांडेला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तब्बल 15 दिवस दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे तळ ठोकून होते.
हेही वाचा