पुणे - खेड येथील द्वारका वृद्धाश्रमातील सर्व सभासद कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित आहेत. लस घ्यायची असल्यास लसीकरण केंद्रावर यावे लागेल, अशी अट आरोग्य विभागाने घातली आहे. परंतु, आमच्याकडील अनेक जणांना आधाराशिवाय चालता येत नाही, प्रवासाच्याही अडचणी आहेत. अशावेळी आश्रमात येऊन लसीकरण केल्यास कोरोनापासून आमचा बचाव होईल. त्यामुळे शासनाने प्रत्येक वृद्धाश्रमात लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी या वृद्धाश्रमातील सदस्य विजय प्रभूदेसाई यांनी केली आहे.
दिवसागणिक स्थिती होत आहे बिकट -
राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांमुळे वृद्धाश्रमातील मदतीचा ओघ कमी झाल आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास वृद्धाश्रमातील निराधारांवर उपासमारीची वेळ ओढावण्याची शक्यता आहे, अशी माहिती या वृद्धाश्रमाचे संस्थापक दिनकर पवार यांनी दिली. तसेच पहिल्या लॉकडाऊनची झळ इतक्या मोठ्या प्रमाणात बसली नव्हती. पण आता पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे आर्थिक चणचण जाणवत आहे. मदतीचा ओघ कमी झाल्यामुळे दिवसागणिक स्थिती बिकट होत आहे. आम्ही स्वखर्चातून निराधारांचे पोट भरत आहोत. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. शासनाने वृद्धाश्रमांच्या प्रश्नाकडे वेळीच लक्ष न दिल्यास स्थिती बिकट होईल. वृद्धाश्रमातील सदस्यांना कोरोना प्रतिबंध लस मिळावी, यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाशी वेळोवेळी मागणी केली. परंतु वृद्धाश्रमातील सदस्यांना रुग्णालयात घेऊन या, मग लस दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. काही सदस्य अपंग असल्याने त्यांना रुग्णलयात घेऊन जाणे शक्य नसल्याने आरोग्य विभागाने वृद्धाश्रमात येऊन लस द्यावी, अशी मागणीही पवार यांनी केली.
वृद्धांना कोरोना प्रतिबंधित लस दिली जाईल -
यासंदर्भात खेडच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता लवकरात लवकर यावर निर्णय घेण्यात येईल आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना कोरोना प्रतिबंधित लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी गाढवे यांनी दिली.
हेही वाचा - विरारमधील जळीत कांड प्रकरण; गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केली दोघांना अटक