पुणे - झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना हडपरसमधील समर्थनगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. रामदास दगडू वाघमारे (वय-45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक बाबुराव देवडे (वय-76) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - डोळ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.. अन् कट मारला म्हणून त्याचाच डोळा निकामी झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील समर्थनगर म्हाडा कॉलनीत पत्र्याचे मोकळे शेड आहे. या ठिकाणी परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी येऊन झोपतात. दोन दिवसांपूर्वी रामदास वाघमारे आणि अशोक देवडे यांच्यात झोपण्याच्या जागेवरून भांडण झाले होते. त्याचा राग देवडे यांच्या मनात होता. घटनेच्या दिवशी वाघमारे हे गाढ झोपेत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.
हेही वाचा - पुण्यात गिझरमधील वायूमुळे खासगी शिकवणी घेणाऱ्या तरुणाचा गुदमरून मृत्यू