पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. याच पाश्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व उद्याने आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पुर्ण वेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर
शहरातील उद्यानांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने संबंधी निर्देश असल्याने उद्यानात येणाऱ्या नागरिकांना एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील सर्व उद्याने आणि कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे पुर्ण वेळ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. तसेच पूढील आदेश येईपर्यंत शहरातील उद्याने पूर्ण वेळ बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.