पुणे - वारजे परिसरातील एका उड्डाणपुलावरून दारुच्या नशेत खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्नात असणाऱ्या एकाला वारजे पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. मंगळवारी (दि. 22 सप्टें.) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी व्यक्ती ही दारूच्या नशेत होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावरील एका उड्डाणपुलावर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्नात होता. दरम्यान, ही व्यक्ती उड्डाणपूलाच्या कठड्यावर चढून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून उड्डाणपुलाच्या खाली बघ्यांची मोठी गर्दी झाली. उड्डाण पुलाखाली जमलेल्या अनेक नागरिकांनी त्याला मागे हो, उडी टाकू नको, असे सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. या दरम्यान काही नागरिकांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून संबंधित प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला उड्डाणपुलाच्या कठड्यावरुन ओढून बाजूला घेत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला नाव आणि पत्ता सांगण्यासाठी नकार दिला. तासाभरानंतर त्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती दिली. अखेर पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या तत्परतेने त्याचे प्राण वाचवल्यामुळे त्याच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा - पुण्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार; चढ्या दराने वॉर्डबॉय विकत होता इंजेक्शन्स