पुणे - दुपारच्या सुमारास पोहायला गेलेल्या चुलते-पुतण्याचा घोड नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील कोलदरे येथे घडली. चुलता उल्हास हिरामण काळे व पुतण्या रोहन राजेंद्र काळे अशी मृतांची नावे आहेत.
पोहायला गेलेल्या चुलता पुतण्याचा नदीत बुडुन मृत्यू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे काळे कुटुंब मुंबईवरून गावाला आले होते. आज दुपारी 3 च्या दरम्यान घरातील चार जणांसह हे दोघे घोडनदीवर पोहायला गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबत असणाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तातडीची मदत न मिळाल्याने दोघेही पाण्यात बुडाले. काही वेळात स्थानिकांच्या मदतीने दोघांना नदीपात्रातून बाहेर काढून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉ. प्रतापराव चिंचोलीकर यांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप पवार पुढील तपास करत आहेत.
उल्हास काळे व रोहन काळे यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी गावी आले होते. रोहनने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तर उल्हास यांचा मुंबई येथे कॉम्प्युटर स्वॉप्टवेअर व्यवसाय आहे.