दौंड - पाटस येथील मधुकर आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा डॉ. गणेश आव्हाड यांनी पाटस आणि वरवंड येथील कोविड सेंटरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ६३ पीपीई किट दिले. या ६३ किटची किंमत सुमारे २ लाख रुपये इतकी आहे. सामाजिक बांधिलकी जपत गणेश आव्हाड यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कोरोना काळात मदतीची भावना-
सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून कोविड सेंटरसाठी आवश्यक वस्तू नागरिकांकडून कोविड सेंटरला देण्यात येत आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे 63 पीपीई किट भेट -
पाटस येथील डॉ. मधुकर आव्हाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून त्यांचा मुलगा डॉ. गणेश आव्हाड (MD) व डॉ. अर्चना आव्हाड (MD, PhD) लोटस हेल्थकेअर क्लिनिक, टिळक रोड, पुणे यांच्याकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पीपीई किट पाटस आणि वरवंड येथील कोविड सेंटरला भेट देण्यात आले. गणेश आव्हाड हे सध्या पुणे येथे राहतात. मात्र पाटस हे जन्म गाव असल्याने त्यांनी आपल्या गावासाठी ही मदत केली आहे. हे सर्व पीपीई किट आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. युरोपियन सेफ्टी, हेल्थ आणि इनव्हायरमेंटल यांनी सुरक्षिततेसाठी मान्यता दिलेले असे हे किट आहे. या पीपीई किटमुळे कोविड सेंटरला काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळण्यास मदत होणार आहे.
‘पाटसमध्ये सर्व लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू केलं आहे. यामुळे काळाची गरज ओळखून कोविड सेंटरसाठी कमी असलेले पीपीई किट देण्याचा निर्णय घेतला. पीपीई किटचा फायदा कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना होईल. फ्रंटलाईन वर्कर्सची सुरक्षा आणि त्यांचा जीव वाचवणे गरजेचे आहे, या भावनेतून वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पीपीई किट भेट दिले’, असे डॉ. गणेश आव्हाड यांनी म्हटले.